नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, गांधी जयंतीनिमित्त प्रिय बापूंना नमन करतो. त्यांच्या आयुष्यापासून आणि उदात्त विचारांमधून बरेच काही शिकायचे आहे. समृद्ध भारत घडविण्यात बापूंचे आदर्श आम्हाला मार्गदर्शन करत राहतात, असं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीटसोबत स्वच्छतेचा संदेश देणार एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही अन्यायाविरुद्ध झुकणार नाही. मी असत्यावर सत्याने विजय मिळवेल. असत्यावर विजय मिळवताना मी सर्व त्रास सहन करेल, गांधी जयंतीच्या शुभेच्छा, असं राहुल गांधींनी म्हटलंय.


केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, महात्मा गांधींचं जीवन आणि तत्वज्ञान सर्व भारतीयांसाठी प्रेरणा आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन करतानाच त्यांनी आपल्याला सत्य, अहिंसा, स्वराज आणि स्वच्छतेच्या विषयात नवी दिशा आणि तत्वज्ञान सांगितलं.   पूज्य बापू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे की, गांधीजींची 151 वी जयंती दिन म्हणजे गांधीजींचं जीवन आणि विचारांच्या प्रकाशात आपल्या प्राधान्यक्रमांबद्दल विचार करणे आणि त्याविचारांचं अंतःकरणापासून अनुकरण करत स्वतःला पुन्हा तयार करण्याची ही एक चांगली संधी आहे.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे की, जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण या बहुविध विषयांवरील विचार आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !