नवी दिल्ली: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नेतन्याहू नवी दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबईला भेट देणार आहेत.


रविवारी भारतात आलेल्या नेतन्याहू यांचं स्वागत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. प्रोटोकॉल तोडून मोदी विमानतळावर दाखल झाले होते.

मात्र प्रोटोकॉल मोडण्याची मोदींची ही पहिलीच वेळ नाही. विविध देशांच्या प्रमुखांच्या स्वागतासाठी मोदींनी अनेकवेळा प्रोटोकॉल मोडले आहेत.

मोदींनी गेल्या चार वर्षात जवळपास दहावेळा प्रोटोकॉल मोडला आहे. याउलट माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दहा वर्षांच्या कार्यकाळात केवळ तीन वेळाच प्रोटोकॉल तोडला होता.

प्रोटोकॉलनुसार अन्य देशांच्या प्रमुखांचं स्वागत पंतप्रधान नव्हे तर परराष्ट्र मंत्र्यांनी करायचं असतं. पण मोदींनी त्याला फाटा देत स्वत:हून अनेकवेळा हजेरी लावली.

मोदींनी कधी कधी प्रोटोकॉल मोडला?

सप्टेंबर 2014 – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचं अहमदाबादमध्ये स्वागत

जानेवारी 2015 – अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा यांचं विमानतळावर जाऊन स्वागत

डिसेंबर 2015 – जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं वाराणसीत स्वागत

जानेवारी 2016 – फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष ओलांद यांचं चंदीगढमध्ये स्वागत

जानेवारी 2017 – अबूधाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांचं दिल्लीत स्वागत

एप्रिल 2017 – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं दिल्ली विमानतळावर स्वागत

जुलै 2017 – जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत अहमदाबादेत रोड शो

2017- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यासोबत दिल्ली मेट्रोतून प्रवास

2017- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका यांच्यासोबत हैदराबादेत डिनर

जानेवारी 2018 – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू याचं दिल्ली विमानतळावर स्वागत

यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही प्रोटोकॉल मोडला होता. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि जॉर्ज बुश यांच्या भारत दौऱ्यावेळी सिंह यांनी प्रोटोकॉल मोडून त्यांचं स्वागत केलं होतं.

मनमोहन सिंहांनी मोडलेले प्रोटोकॉल

मार्च 2006 मध्ये जॉर्ज बुश सपत्नीक भारत भेटीवर आले होते, त्यावेळी मनमोहन सिंह यांनी प्रोटोकॉल मोडला होता.

याशिवाय 2006 मध्येच सौदी अरेबियाचे राजे अब्दुल बिन अब्दुल अझीज अल सौद हे भारतात आले होते, त्यावेळी मनमोहन सिंहांनी प्रोटोकॉल मोडला होता. त्यावेळी जवळपास 51 वर्षांनी सौदीच्या राजांनी भारताला भेट दिली होती.

नोव्हेंबर 2010 मध्ये बराक ओबामा तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह हे स्वत: त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.