श्रीनगर: भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. स्थानिक पोलीस आणि लष्करानं ही संयुक्त कारवाई केली.
दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशानं जैश ए मोहम्मदचे चार दहशतवादी काश्मीरमध्ये घुसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही धाडसी कारवाई करण्यात आली.
आधी तीन अतिरेक्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं होतं. मात्र चौथा अतिरेकी लपून बसला होता. जम्मू काश्मीर पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई करत, त्यालाही शोधून काढलं. त्याच्यासोबत झालेल्या चकमकीत जवानांनी त्यालाही यमसदनी धाडलं.
दरम्यान, या कारवाईबद्दल जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक शेष पॉल यांनी सुरक्षारक्षकांचं कौतुक केलं.
श्रीनगरबाहेर स्फोटकं
सुरक्षारक्षकांना रविवारी काही स्फोटकं आढळली होती. याशिवाय शनिवारी श्रीनगर-मुजफ्फराबाद शक्तीशाली स्फोटकं निकामी करण्यात सुरक्षारक्षकांना यश आलं होतं.
ही सर्व प्रकरणं पाहता, अतिरेक्यांचा भारतात हल्ला करण्याचा मोठा डाव आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काश्मिरी शिक्षणात डोकावू नका: मंत्री
जम्मू काश्मीरचे शिक्षणमंत्री सैय्यद अल्ताफ बुखारी यांनी सैन्याने काश्मिरी शिक्षणात डोकावू नये, स्वत:च्या कामात लक्ष द्यावं, असा सल्ला दिला आहे.
भारतीय सेनेचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं होतं. काश्मिरी शाळांमध्ये दोन प्रकारचं शिक्षण दिलं जातं. एक भारताचं आणि दुसरं म्हणजे जम्मू काश्मीरचं, असं रावत म्हणाले होते.
पाकला घरात घुसून मारु : लष्करप्रमुख
भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला थेट इशारा दिला. युद्ध झालं आणि सरकारची संमती मिळाली तर पाकिस्तानात घुसून हल्ला करु. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्या देणं पाकिस्तानने बंद करावं, असं बिपीन रावत म्हणाले.
संबंधित बातम्या
लष्करप्रमुखांच्या वक्तव्यानंतर पाक हादरलं, अणूबॉम्बची धमकी