मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचं (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नेमकं काय होणार या उत्तरासाठीची प्रतीक्षा लांबत चालली आहे. आज होणारी सुनावणी एका न्यायमूर्तींच्या उपलब्धतेमुळे होऊ शकलेली नाही. सरन्यायाधीश रमण्णा (Chief Justice of India N.V.Ramana) यांच्या निवृत्तीची तारीख जवळ येत चालल्यानं आता त्याआधी काही महत्वाचा निर्णय होतो का याचं उत्तर उद्या कळेल.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी 4 ऑगस्टपासून दोन वेळा लांबणीवर गेलेली सुनावणी आज तिसऱ्यांदा लांबणीवर गेली. आज होणारी सुनावणी आता उद्या होईल अशी शक्यता आहे. उद्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे सरन्यायाधीश रमण्णा आपल्या निवृत्तीआधी काही मोठा निर्णय देणार की प्रकरण घटनापीठाकडे सोपवून मोकळे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
26 ऑगस्ट ही न्या. रमण्णा यांच्या निवृत्तीची तारीख आहे. तर उद्या 23 ऑगस्टला अखेर या प्रकरणाची सुनावणी होत आहे. म्हणजे कारकीर्दीच्या शेवटच्या चार दिवसांत सरन्यायाधीश या प्रकरणाचं काय करणार हा महत्वाचा सवाल आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्याच अध्यक्षतेखाली या प्रकरणाची सुनावणी होत आहे. आज ही सुनावणी लांबणीवर गेली, कारण सुप्रीम कोर्टाचे एक सरन्यायाधीश उपलब्ध नव्हते. आता उद्या विशेष पीठ काय करतं हे पाहावं लागेल.
काय अपेक्षित आहे उद्याच्या सुनावणीत?
- सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत, निवृत्तीआधी ते हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवतात का? हे उद्या कळेल
- प्रकरण घटनापीठाकडे गेले तर ते अधिक काळ लांबेल याचीही शक्यता
- काही मुद्द्यांवर घटनापीठाकडे हे प्रकरण जाईल, पण काही मुद्द्यांवर कोर्ट आपला निकाल देतं का याचीही उत्सुकता असेल
- विशेषत: अपात्रतेसंदर्भातल्या कारवाईबाबत आता अजून किती काळ स्थगिती राहते हे पाहणं महत्वाचं असेल.
दुसरीकडे निवडणूक आयोगात उत्तराची मुदतही उद्याच संपतेय. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे गटाकडून आयोगातही काय बाजू मांडली जाते हे पाहणं महत्वाचं असेल. सुप्रीम कोर्टातली कार्यवाही होईपर्यंत निवडणूक आयोगात कुठलाही निर्णय होऊ नये हा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. पण उद्याच्या उत्तरानंतर आयोग पुढची पावलं काय उचलतं हे पाहावं लागेल.