नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (मंगळवारी) मध्यरात्री उशिरा अचानक गुप्त दिल्ली दौरा केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार कुजबूज सुरु झाली. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे.


मुख्यमंत्री काल रात्री उशिरा दिल्लीत पोहचले. त्यानंतर मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास त्यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. पहाटे जवळपास तीन-साडेतीन वाजेपर्यंत ही चर्चा सुरु होती. त्यानंतर भल्या पहाटे मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात परतले.

इतक्या मध्यरात्री झालेली दिल्ली भेट नेमकी कुठल्या कारणासाठी झाली हे अस्पष्ट आहे. पण कालच संसदेत आर्थिक आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं, त्या विधेयकाला राज्यातल्या मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी आहे. लोकसभा, विधानसभा एकत्रित होण्यासंदर्भातली चाचपणी यात झाली का अशीही चर्चा आहे.

विशेष म्हणजे आज सकाळीच पंतप्रधान मोदी स्वत: महाराष्ट्र दौऱ्यावर होते. चार ते पास तासांच्या कालावधीत उभयतांची प्रत्यक्ष भेट होणारच होती. मग इतका तातडीचा असा काय विषय होता, ज्यासाठी इतक्या मध्यरात्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात आलं असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात गुप्त बैठकीनं चर्चेत आलेली ही रात्र नेमकी कुठल्या वैऱ्यासाठी होती? या प्रश्नाचं उत्तर कदाचित काही कालावधीनं मिळू शकेल.