नवी दिल्ली : दिल्लीत कालपासून गारपिटीसह पाऊस पडत आहे. कालपासून हवामानात बदल झाल्याने हवेतील गारवा वाढला आहे. मात्र रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्याने दिल्लीत वाहतूक कोंडी झाली आहे.

दिल्लीत काल रात्रीपासून ढगांच्या कडकडाटासह अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या बदलत्या हवामानाचा दिल्लीकर आनंद घेत आहेत. तसेच काही ठिकाणी गारपिटही झाली. त्यामुळे दिल्ली शहरातील तापमानात घट झाली आहे. दिल्लीमध्ये आज सकाळपासून हलक्या सरी पडत आहेत.

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने मथुरा रोडपासून आश्रम रोडला जाणाऱ्या रस्त्यावर गाड्यांची रांग लागली आहे. त्याचबरोबर राजापुरी चौकापासून पालमला जाणाऱ्या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

पावसामुळे दोघांचा मृत्यू
दिल्लीतील नजफगडमध्ये काल पावसामुळे गोदामाची भिंत पडल्याने दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाय एक जण गंभीर जखमी झाला आहे. बुलंदशहर येथील जसवीर (20) आणि करीम (25) अशी मृतांची नावे आहेत.

दिल्लीसह पंजाब आणि हरियाणामधील काही भागात काल पाऊस झाला. तसेच उत्तराखंडमध्ये पण गारपिट झाली आहे. आज आणि उद्याही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवानमान विभागाने वर्तवला आहे.