नवी दिल्ली : सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख जाहीर केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा 25 एप्रिलला होणार असल्याचं सांगितलं.


दरम्यान, दहावीच्या गणित विषयाबाबत केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून 15 दिवसात फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरियाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही याबाबत ट्वीट करुन माहिती दिली. गरज पडल्यास केवळ दिल्ली आणि हरियाणात गणिताचा पेपर पुन्हा घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय कुणीही गोंधळून जाण्याचं कारण नाही, असं आवाहनही त्यांनी केलं.

दहावीचा गणिताचा पेपर 28 मार्चला झाला होता. तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 27 मार्चला घेण्यात आला होता. हे दोन्ही पेपर लीक झाल्याचं समोर आलं होतं.

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांदरम्यान, पेपरफुटीच्या अनेक घटना घडल्या. त्याचं लोण महाराष्ट्रातही पसरलं होतं. या पेपरफुटीमुळे सीबीएसईने दोन पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला होता.