नवी दिल्ली : रेल्वेमधील नोकऱ्यांची संख्या वाढली असून, आता 90 हजारांऐवजी 1 लाख 10 हजार जागांसाठी भरती होणार आहे. म्हणजेच आणखी 20 हजार जणांची भरती केली जाईल. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरुन याबाबत घोषणा केली.


आरपीएफमध्ये 9 हजार रिक्त पदं आहेत आणि आरपीएसएफमध्ये 10 हजारहून अतिरिक्त नोकऱ्या आहेत, अशीही माहिती गोयल यांनी दिली.

या 1 लाख 10 हजार जागांसाठी अडीच कोटींहून अधिक जणांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच, एक पदासाठी सरासरी 225 ते 230 जणांनी अर्ज केले आहेत.


एक लाख 10 हजार जागांसाठी अडीच कोटी जणांनी अर्ज केले असल्याने जगभरात या भरती प्रक्रियेची चर्चा सुरु झाली आहे. प्रसिद्ध वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येहून अधिक जणांनी तर केवळ अर्ज केले आहेत.

शनिवारपर्यंत म्हणजेच 31 मार्चपर्यंत उमेदवारांना रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र त्याचवेळी अनेकांना ऑनलाईन अर्ज करताना, अडचणी येत असल्याचीही माहिती मिळते आहे. अनेक ठिकाणी वेबसाईट हँग होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

भारतीय रेल्वेमध्ये सध्या 13 लाख कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. म्हणजेच इतक्या मोठ्या संख्यात रेल्वेमध्ये रोजगार दिला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली केंद्रात सत्तेत आल्यानंतर आश्वासन दिले होते की, आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारतात निर्माण करु आणि मोठ्या संख्येत रोजगारही उपलब्ध करु. त्यासाठी ‘मेक इन इंडिया’सारखा महत्त्वाकांक्षी अभियानही केंद्राद्वारे हाती घेण्यात आला.