नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये अल्पसंख्याक विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवी योजना आखली आहे. मदरशांचा चेहरा-मोहरा बदलण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मदरशांमधील पाच कोटी विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्ष स्कॉलरशीप देण्यासाठी 3E योजना मोदी सरकारने आखली आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली.
3E म्हणजे एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि एम्पावरमेंट. यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक मुलींचा समावेश केला जाणार आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार पाच कोटींहून अधिक गरीब अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देणार आहे. त्यामुळे एका कुटुंबातील एक विद्यार्थ्यांने चांगलं शिक्षण घेतलं, तर त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होईल. या योजनेद्वारे अल्पसंख्याक मुलांसाठी 'पढो और बढो' हे अभियान राबवले जाणार आहे.
पुढील महिन्यापासून या योजनेला सुरुवात केली जाणार आहे. मदरशांमध्ये हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि कॉम्प्युटरचं शिक्षण मिळावं म्हणून तेथील शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून हा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी माहिती मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली.
मोदी सरकार जातीयभेद नष्ट करुन सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करत आहे. अधिकार, न्याय आणि अखंडता टिकवणारं हे सरकार असल्याचं सिद्ध झालं आहे, असं मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं.