चेन्नई : तामिळनाडूत प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आठवड्यातून किमान एकदा 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत गाण्याची सक्ती मद्रास हायकोर्टाने केली आहे.

वीरमणी नावाच्या व्यक्तीने यासंदर्भात केस दाखल केली होती. राज्य भरती मंडळाची परीक्षा तो केवळ एका गुणामुळे अनुत्तीर्ण झाला. 'वंदे मातरम्' कोणत्या भाषेत लिहिलं आहे, या प्रश्नाचं 'बंगाली' असं उत्तर दिल्यामुळे त्याचा एक गुण हुकला.

'वंदे मातरम्' हे बंगालीमध्ये लिहिलं आहे की संस्कृत, यावर स्पष्टता आणण्यासाठी वीरमणीने मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी 'वंदे मातरम्' हे गीत रचलं होतं.

13 जून रोजी अॅडव्होकेट जनरल आर मुथुकुमारसामी यांनी 'वंदे मातरम्'ची मूळ भाषा संस्कृत असून ते बंगालीत लिहिल्याचं सांगितलं. त्यानंतर कोर्टाने वीरमणीला परीक्षेत गमावलेला एक गुण देण्याचा निर्णय घेतला.

मद्रास हायकोर्टाचा निर्णय काय?

प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आठवड्यातून किमान एकदा 'वंदे मातरम्'
गाण्यात/वाजवण्यात यावं (शक्यतो सोमवार किंवा शुक्रवार)

सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, फॅक्टरीमध्ये महिन्यातून किमान एकदा 'वंदे मातरम्' गाण्यात/वाजवण्यात यावं

एखादी व्यक्ती किंवा संघटनेला 'वंदे मातरम्' गाताना किंवा वाजवताना अडचणी येत असतील, तर त्यावर
सक्ती करता कामा नये.