भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये आज 19 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात भाजपला काँग्रेसने कडवी झुंज दिली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 9-9 नगरपालिकांमध्ये विजय मिळवत आपला उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान केला. तर एका नगरपालिकेत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.
निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने नऊ नगरपालिकांमध्ये विजय मिळवला. यात प्रामुख्याने पीथमपूर आणि डही, कुक्षी, धामनोद, पानसेमल, राजपूर, पलसूद आणि ओंकारेश्वर नगरपालिकांचा समावेश आहे. तर सेंधवा नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने, तिथे भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे.
तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या राघोगढ नगरपालिकेसह बडवानी, मनावर आणि धार नगरपालिकेत विजय मिळवला. याशिवाय, अंजड, खेतिया, सरदारपूर, राजगढ आणि धरमपूरीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे. तर जैतहारी नगरपालिकेत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या निराशाजनक कामगिरीचे खापर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंदसौरचे भाजपचे बंडखोर उमेदवारावर फोडलं आहे. मंदसौरमधील भाजपच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसला सात नगरपालिका भाजपकडून हिस्कावून घेण्यात यश मिळालं आहे. यावर मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजय सिंह म्हणाले की, “राज्यातील जनता भाजपवर नाराज असल्याचं, या निवडणूक निकालातून सिद्ध होतं. सरकारी यंत्रणा आणि पैशांचा वापर करुनही, या निवडणुकीत भाजपच्या हाती अपयश आलं.”
मध्य प्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची भाजपला टफ फाईट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jan 2018 10:40 PM (IST)
मध्य प्रदेशमध्ये आज 19 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात भाजपला काँग्रेसने कडवी झुंज दिली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 9-9 नगरपालिकांमध्ये विजय मिळवत आपला उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -