Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातून एक अत्यंत लाजिरवाणे चित्र समोर आले आहे. ज्यात पत्रकारांना नग्न करून पोलीस ठाण्यात उभे करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना केवळ अंतर्वस्त्र परिधान करून पोलीस ठाण्यात ठेवले. याशिवाय या पत्रकारांची समाजात बदनामी व्हावी यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक हे छायाचित्र व्हायरल केल्याचा आरोपही केला जात आहे. त्यांनी भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या चालवल्याने त्यांना अशी वागणूक दिल्याचा आरोप आहे.


आमदाराच्या विरोधात बातम्या चालवल्याचा आरोप
मध्यप्रदेशातील कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीसांकडून पत्रकारांशी गैरवर्तन करत अर्धनग्न अवस्थेत उभे केल्याचे प्रकरण आता जोर धरू लागले आहे. याची देशभरात चर्चा सुरू आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्टेशन प्रभारी आणि पोलीस उपनिरीक्षकांना धारेवर धरण्यात आले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सिधीचे पोलीस अधीक्षक मनोज श्रीवास्तव यांचे वक्तव्य समोर आले आहे. आम्ही याची चौकशी करत असून लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.


काय आहे प्रकरण?


हे प्रकरण मध्य प्रदेशातील आहे. येथे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे पोलीस गुंडगिरीवर उतरले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका छायाचित्रात मध्य प्रदेश पोलिसांनी नग्न करून भाजप आमदाराविरोधात बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांना पोलिस ठाण्यात उभे केल्याचे सांगण्यात आले आहे. यातील बहुतांश पत्रकार स्वतःचे यूट्यूब चॅनलही चालवतात. सुत्रांच्या माहितीनुसार मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे पोलीस गुंडगिरीवर उतरले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या एका छायाचित्रात मध्य प्रदेश पोलिसांनी भाजप आमदाराविरोधात बातम्या दाखवणाऱ्या पत्रकारांना अंगावरील कपडे काढून पोलीस ठाण्यात उभे केल्याचे सांगण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ राकेश पाठक यांनी ट्विटमध्ये या फोटोबद्दल सांगितले आहे की, हे सर्व पत्रकार मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील आहेत. त्यांनी लिहिले आहे की, एमपीच्या सिधी जिल्हा पोलिसांनी पत्रकारांना अर्धनग्न अवस्थेत पोलिस ठाण्यात उभे केले आहे. या पत्रकारांपैकी एक, कनिष्क तिवारीच्या बघेली यूट्यूब चॅनेलचे 1.25 लाख सदस्य आहेत.






कोणीही नग्न नाही, प्रत्येकाने अंतर्वस्त्र घातलेले आहे, पोलीसांचे थेट उत्तर
पत्रकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कपडे पोलिस ठाण्यात का काढले? असा पत्रकारांनी प्रश्न विचारताच पोलिसांनी थेट उत्तर दिलंय,  'कोणीही नग्न नाही, प्रत्येकाने अंतर्वस्त्र घातलेले आहे, कोणीही आत्महत्या करू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे'






या संपूर्ण प्रकरणाबाबत एसपी काय म्हणाले
सिधीचे पोलीस अधीक्षक मनोज श्रीवास्तव म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकवर स्थानिक आमदार केदारनाथ शुक्ला यांच्या मुलाच्या नावाच्या फेक आयडीवरून अनियंत्रित पोस्ट टाकल्या जात होत्या, याप्रकरणी पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या नीरज कुंदर नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. अटक केल्यानंतर नीरजच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळताच कुटुंबीयांनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गोंधळ घातला. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक पत्रकारही होते. त्यापैकी बहुतेकजण यूट्यूबच्या चॅनेलसाठी रिपोर्ट करायचे. या गोंधळात पोलिसांनी अनेक स्पष्टीकरणे दिली, पण लोकांनी ऐकले नाही. यानंतर पोलिसांनी लोकांना जबरदस्तीने आत ओढले आणि लॉकअपमध्ये बंद केले. पोलिसांनी अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 


पत्रकारांवरील वाढते हल्ले


कोणत्याही लोकशाहीत स्वतंत्र पत्रकारिता महत्त्वाची भूमिका बजावते, परंतु गेल्या काही वर्षांत भारतातील पत्रकारिता अत्यंत कठीण काळातून जात आहे. नुकतेच बलिया येथील पत्रकारांवर पेपरफुटीच्या बातम्या चालवल्यानंतर त्यांना दोषी ठरवून तुरुंगवास भोगावा लागला. तसेच दिल्लीत झालेल्या हिंदू महापंचायतीत पत्रकारांना त्यांची धार्मिक ओळख आणि कामापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत 142 व्या क्रमांकावर आहे. तसेच केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांना यूपी सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात डांबून ठेवले होते, त्यांचा दोष हा होता की ते राज्यातील बलात्कार प्रकरण हातरस घटनेचे कव्हरेज करण्यासाठी जात होते. तसेच काश्मीरमध्येही अनेक पत्रकारांना कामापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत.