Age For Consent Physical Relation: सहमतीने शरीरसंबंध ठेवण्याची वयोमर्यादा कमी केली जावी अशी विनंती हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) केली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) हायकोर्टाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने सहमतीने शरीर संबंध ठेवण्याचे वय 18 वर्षांवरून 16 वर्षांवर करण्याची विनंती केली आहे. आता, या मुद्यावरून पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाला अशी सूचना करण्यामागील कारणदेखील सांगितले आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने म्हटले की, इंटरनेटच्या युगात मुलं लवकर वयात येत आहेत. अनेक किशोरवयीन मुले हे 18 वर्ष पूर्ण करण्याआधीच मुलींसोबत शरीरसंबंध ठेवत आहेत. त्यानंतर पोलिसांकडून पॉस्को आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करतात. या कारवाईमुळे मुलांच्या भवितव्यावरही परिणाम होत आहे. वयात येत असताना विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, मुलांकडून शरीरसंबंध ठेवले जातात आणि भविष्य अंधकारमय होते, असे मध्य प्रदेश हायकोर्टाने म्हटले.
एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हा सल्ला दिला. ग्वाल्हेरच्या थाटीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल जाटव याच्याविरुद्ध 14 वर्षीय मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल 17 जुलै 2020 पासून तुरुंगात आहे. पीडित मुलगी राहुलच्या कोचिंग सेंटरमध्ये शिकण्यासाठी जात असे. 18 जानेवारी 2020 रोजी ती कोचिंगला गेली तेव्हा तिथे कोणीच नव्हते. तेथे उपस्थित असलेल्या राहुलने तिला ज्यूस दिला, त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. यानंतर राहुलने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि आणखी अश्लील व्हिडिओ बनवले.
पीडित मुलीने राहुलवर ब्लॅकमेलिंग आणि व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले असल्याचा आरोप केला. राहुलसोबतच्या शरीरसंबंधामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. कोर्टाच्या परवानगीनंतर तिचा गर्भपात करण्यात आला.
आरोपीच्या वकिलांनी काय म्हटले?
राहुलच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, दोघांमधील संबंध सहमतीने होते आणि त्याच्या अशिलाला विनाकारण गोवण्यात आले आहे. राहुलविरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. त्याचे अपील मान्य करत न्यायालयाने एफआयआर रद्द केला. तसेच, सहमतीने संबंध ठेवण्याचे वय 18 वर्षावरून 16 वर्षे करण्याचा विचार करावा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाला दिला. दिल्लीतील निर्भया घटनेनंतर ही वयोमर्यादा 16 वरून 18 वर्षे करण्यात आली.