Harda Factory Blast : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा (Harda) येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट (Blast) झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 58 जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी तातडीची बैठक बोलावून गृह सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी लष्कराचीही मदत घेण्यात आली आहे.


जखमींना मध्य प्रदेश सरकारच्या हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तर हरदा ते भोपाळ असा ग्रीन कॉरिडॉरही (Green Corridor) बनवला जात आहे. जेणेकरून रुग्णांना लवकरात लवकर रुग्णालयात (Hospital) पोहोचवता येईल.


100 घरं केली रिकामी


मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात आतापर्यंत दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 60 हून अधिक घरांना या स्फोटाचा फटका बसला आहे. अपघातानंतर 100 घरे रिकामी करण्यात आली आहेत. 


मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत - मोहन यादव


हरदा येथील या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघाताबाबत बैठक घेऊन गृह सचिवांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यादव यांनी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.


हरदा-भोपाळ दरम्यान ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती


जखमींसाठी हरदा ते भोपाळ दरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला आहे. भोपाळच्या हमीदिया आणि एम्समध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. हरदा दुर्घटनेतील मदतकार्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात एसीएस मोहम्मद सुलेमान यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. अध्यक्षांव्यतिरिक्त चार सदस्यांचाही समावेश आहे.


पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त


फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शोक व्यक्त केला आहे. याशिवाय पीएम रिलीफ फंडातून (PM Relief Fund) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.


फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटाची कारणे पुढीलप्रमाणे



  • सुरक्षेचे नियम पाळले नाहीत.

  • अवैध फटाका कारखान्यात फटाक्यांची निर्मिती.

  • सुरक्षा जागरूकता अभाव.

  • फटाके बनवण्याच्या प्रशिक्षणाचा अभाव.

  • आग विझवण्याच्या व्यवस्थेचा अभाव.


फटाके कारखान्याचे काय आहेत नियम?



  • परवान्यासाठी एक एकर जमीन आवश्यक आहे.

  • जमिनीच्या आजूबाजूला कोणतेही निवासी क्षेत्र असू नये.

  • जिथे कारखाना आहे तिथे समोर किंवा मागे 100 मीटरपर्यंत काहीही नसावे.

  • कारखान्याच्या जवळ पॉवर ट्रान्सफॉर्मर नको, हाय टेंशन वायर नसावी.

  • अग्निशमन दल, स्थानिक पोलीस स्टेशनचा ना हरकतीचा दाखला.

  • नो स्मोकिंग बोर्ड, मालकाचे नाव कारखान्यावर असणे आवश्यक.

  • अग्निशामक, वाळूची बादली, पाणी कारखान्यात असणे आवश्यक.

  • कारखान्यात गॅस सिलिंडर, दिवे, ज्वलनशील पदार्थावर निर्बंध.  

  • मालकाकडे फटाके अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक.

  • फॅक्टरी कर्मचाऱ्यांना अग्निशामक यंत्रणा कशी चालवायची हे माहीत असणे आवश्यक.

  • कारखान्यात सुरक्षिततेसाठी हातमोजे, विशेष ड्रेस, मास्क, प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक. 


आणखी वाचा 


Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी मिळणार, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत