Madhya Pradesh Election Results :  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Madhya Pradesh Election 2023) भाजपने (BJP) दमदार एकतर्फी विजय मिळवला आहे. तब्बल 20 वर्षांची एंटी इनकंबन्सी असून देखील भाजपने मध्य प्रदेशात मोठा विजय संपादन केला आहे. काँग्रेसला (Congress) मध्य प्रदेशातून विजयाची मोठी अपेक्षा होती. भाजपविरोधात असलेल्या रोषाचा फायदा होईल असा काँग्रेसच्या नेत्यांचा अंदाज होता. मात्र, भाजपच्या थिंकटँकने आखलेल्या रणनीतिसमोर काँग्रेसला पराभवाची चव चाखावी लागली. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या खात्यात 166 जागा तर काँग्रेसला 63 जागा मिळत असल्याचा कल आहे. 


मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे सत्तेची सूत्रे जातील असा अंदाज होता. एक्झिट पोलमधील आकडेवारीदेखील हाच अंदाज वर्तवत होते. मात्र, आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपने आघाडी घेतली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस असल्याचे चित्र होते. मात्र, काही तासानंतर भाजपने आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.  
 


भाजपचा बंपर विजय...


मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा बंपर विजय होत आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपने 65 जागांवर विजय मिळवला असून 101 जागांवर आघाडीवर आहेत. तर, काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला असून 48 जागांवर आघाडीवर आहेत. तर, भारत आदिवासी पार्टीने एका जागेवर विजय संपादन केला आहे. मध्य प्रदेशात भाजपला 48.68 टक्के मते मिळाली आहेत. तर, काँग्रेसला 40.45 टक्के मतदान झाले आहे.



शिवराज सिंह चौहान, कमलनाथ विजयी 


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे बुधनी मतदारसंघातून विजयी झाले. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे देखील छिंदवाडामधून विजयी झालेत. त्याशिवाय, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल यांनी देखील विजय मिळवला आहे. 


काँग्रेसला फटका, भाजपला फायदा 


कॉंग्रेस बाबत असलेली सहानुभूत मतदानामधे रुपांतरीत करण्यात कॉंग्रेस नेते कमी पडले. 2018 साली राज्यात सत्तेत आलेल कॉंग्रेस सरकार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमधे प्रवेश केल्याने गडगडले.  ज्यामुळे कमलनाथ यांच्याबद्दल लोकांमधे सहानुभूती निर्माण झाली.  पण ही सहानुभूती मतदानात रुपांतरीत होऊ शकली नाही.


 लाडली बहेन योजनेने भाजपला महिलांची बंपर मते मिळवून दिली.  महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा व्हायला लागल्याने महिला मतदारांनी इतर सर्व प्रश्न बाजुला सारून कमळाच्या चिन्हावर बोट दाबलं. जुन महिन्यात या योजनेला सुरुवात झाली. सुरुवातीला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा होऊ लागले. पुढे त्यामधे वाढ होऊन ते साडे बाराशे रुपये झाले. आणि निवडणुकीनंतर त्यामधे तीन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याच आश्वासन महिलांना देण्यात आल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांच मतं भाजपला मिळाली असल्याचे म्हटले जात आहे.