भोपाळ : मध्य प्रदेशचं शिवराज सिंह सरकार कसं प्रचारप्रेमी आहे, याचा प्रत्यय राजधानी भोपाळमधील एक मोठं सरकारी वर्तमानपत्र पाहिल्यावर येतो. 24 पानांच्या वृत्तपत्रामध्ये एक-दोन नव्हे तब्बल 23 पानांवर जाहिराती आहेत.


जाहिरातींच्या माध्यमातून प्रचार मोहीम राबवण्यात शिवराज सरकारने शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. वर्तमानपत्राच्या 23 पानांमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो छापण्यात आले आहेत.

वर्तमानपत्रात जाहिरातींच्या रुपात छापण्यात आलेली ही सरकारी योजनांची माहिती पुस्तिकाच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरकारी योजना बारगळल्यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिला जात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

गेल्या 13 वर्षांपासून शिवराज सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची स्वतःजवळ राखली आहे. गेल्या पाच वर्षात जाहिरात आणि विशेष कार्यक्रमांच्या प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात तीन अब्ज 15 कोटी 43 लाख 55 हजार 232 रुपये खर्च करण्यात आले, अशी माहिती विधानसभेत जनसंपर्क मंत्र्यांनी काँग्रेस आमदार जीतू पटवारी यांना दिली.

गेल्या तीन वर्षात जाहिरातींवर केवळ आठशे कोटी रुपये खर्च झाल्याचं जुलै 2017 मध्ये सरकारने सांगितलं होतं. शिवराज सरकार दीड लाख कोटी रुपयांच्या खर्चात बुडालेली असताना जाहिरातींवर ही उधळपट्टी केली जात आहे. गेल्या वर्षी नर्मदा यात्रेवर 24 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता, त्यापैकी मोठा भाग हा प्रचार-प्रसारावर उधळण्यात आला होता.

निवडणुकांचं वर्ष आल्याने प्रचारप्रेमी सरकार जाहिरातींवर खर्च करताना काचकूच करणार नाही, हे तर साहजिक आहे. मात्र प्रचारापेक्षा शिवराज सिंहांच्या ब्रँडिंगवर अधिक खर्च होत असल्याचं दिसत आहे.