भोपाळ: मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान मंत्रीमंडळाचा आज दुसरा विस्तार करण्यात आला.  राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी राजभवनात नवीन मंत्र्यांना शपथ दिली. एकूण 28 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यात 20 कॅबिनेट मंत्री आणि 8 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे.  यात गोपाल भार्गव, विजय शाह, यशोधरा राजे सिंधिया यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.


यांनी घेतली शपथ
राजभवनात  राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.  गोपाल भार्गव, विजय शाह, जगदीश देवडा, बिसाहूलाल सिंह, यशोधरा राजे सिंधिया, भूपेंद्र सिंह, एंदल सिंह कसाना, बृजेंद्र प्रताप सिंह, विश्वास सारंग, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, प्रद्युम्न सिंह तोमर, ओम प्रकाश सकलेचा, उषा ठाकुर, प्रेम सिंह पटेल, हरदीप सिंह डंग, महेंद्र सिंह सिसोदिया, अरविंद सिंह भदौरिया, डॉ. मोहन यादव आणि राज्यवर्धन सिंह यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर भारत सिंह कुशवाहा, इंदर सिंह परमार, रामखेलावन पटेल, रामकिशोर कांवरे, बृजेंद्र सिंह यादव, गिरिराज डंडोदिया, सुरेश धाकड आणि ओपीएस भदौरिया यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक सहा मंत्र्यांसह 22 आमदारांनी काँग्रेसला राम राम ठोकत राजीनामा दिल्याने कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला होता. कमलनाथ यांचं सरकार 15 महिन्यांचंच राहिलं.  शिवराज चौहान यांनी 23 मार्च रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊन दरम्यान जवळपास एक महिनाभर एकट्यानेच सरकारचा गाडा चालवला होता.

24 जागांवर होणार पोटनिवडणूक

मध्य प्रदेश भाजपकडे जुन्या आमदारांची फौज आहे. येत्या काळात 24 जागांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या जागा जिंकण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.  त्यामुळं पक्षाचं ध्यान त्या जागा जिंकण्याकडे आहे.  काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या 22 समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर 22 मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.