भोपाळ: मध्य प्रदेशच्या 28 जागांवर सुरु असलेल्या पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपला स्वत:च्या हिंमतीवर सरकार आणण्यासाठी केवळ 8 आमदार निवडून आणण्याची गरज आहे. कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराने भाजपमध्ये उडी घेतल्याने मध्यप्रदेश विधानसभा आता 229 सदस्यांची झाली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा जो 230 सदस्यांच्या संख्येवेळी 116 होता तो आता 115 वर आला आहे. मध्य़ प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या जागांसाठी पोटनिवडणूक झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.


सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही पोटनिवडणूक महत्वाची आहे कारण या पोटनिवडणूकीच्या आधारे सरकार तरु शकते किंवा उलटू शकते. या दोन्ही पक्षांनी सर्व जागा निवडून येण्याची आशा व्यक्त केली आहे.


कॉंग्रस आणि भाजपमध्ये या पोटनिवडणुकीत टोकाचा वाद झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या 22 समर्थक आमदारांच्या सोबत कॉंग्रेसला रामराम केला होता आणि कमलनाथ सरकार पाडले होते. त्यामुळे 20 मार्चला त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला होता. त्यांनतर भाजपचे शिवराज सिंह सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांबद्दल कॉंग्रेमध्ये मोठ्या प्रमाणात राग होता. मतमोजणीला सुरुवात व्हायच्या आधी मध्य प्रदेश महिला कॉंग्रेसने त्याच्या ट्विटरवर लिहले होते की, "जिंकेल कोणीही, हारतील फक्त गद्दार."


मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या निकालात आज अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यात राज्यवर्धन सिंह दत्तीगांव, ऐंदल सिंह कंसाना, बिसाहूलाल सिंह, गिरिराज दंडोतिया, ओपीएस भदौरिया, सुरेश धाकड़, बृजेंद्र सिंह यादव, गोविंद सिंह राजपूत, प्रभु राम चौधरी, इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, हरदीप सिंह डंग, इमरती देवी आणि महेंद्र सिंह सिसोदिया यांच्या समावेश आहे. कमलनाथ यांच्या 'आयटम' वाल्या वक्तव्यानंतर इमरती देवी या प्रसिध्दीच्या झोतात आल्या. इमरती देवी यांची जागा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठाची बनली आहे. त्यांनी एका प्रचारात सांगितले होते की इमरती देवी नाही तर स्वत: ज्योतिरादित्य शिंदे लढत आहेत असे समजून लोकांनी मतदान करावे.


आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार 6 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे तर 2 जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे.