भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये आज झालेल्या विधानसभेच्या मतदानादरम्यान 100 हून अधिक ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ज्या मतदान केंद्रावर कॉंग्रेसच्या बाजूने मतदान होणार आहे, त्या मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्या आहेत, असा दावा कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
बिघाड झालेल्या ईव्हीएम मशीन नंतर बदलण्यात आल्या, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे . पसरवाडा,लांजी आणि बेहर या तीन मतदार संघात सकाळी 7 तर 227 मतदारसंघात सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली.
कॉंग्रेस बूथ प्रतिनिधींनी बिघाड झालेल्या मशीनच्या जागी ज्या मशीन बसवण्यात येणार आहे, त्यांचा नंबर नोंद करुन घ्यावा, तसेच नवीन मशीनने मतदान प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी मतदान करुन पहावं, अशा सूचना दिग्विजय सिंह यांनी दिल्या होत्या.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी ईव्हीएममध्ये बिघाड झालाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मोठ्या संख्येने ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानावर परिणाम होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर मोठी रांग लागली होती. तरी निवडणूक आयोगाने यासंबंधी निर्णय घेऊन, तात्काळ बंद मशीन बदलाव्या, अशी मागणी कमलनाथ यांनी केली होती.
दरम्यान ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी जोरदार हल्लाबोल केला. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केल्याने कॉंग्रेसला पराभवाची चिन्हे दिसू लागली आहे, असा टोला त्यांनी लगावला. आता पाच वर्ष कमलनाथ ईव्हीएम बद्दल ट्वीट करत राहतील, असे ते म्हणाले.
दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत या निवडणुकीत विक्रमी 65.5 टक्के मतदान झालं असून, 11 डिसेंबरला या निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत.
मध्यप्रदेश विधानसभा : शंभरपेक्षा जास्त ईव्हीएममध्ये बिघाड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Nov 2018 07:56 PM (IST)
यासंबंधी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ज्या मतदान केंद्रावर कॉंग्रेसच्या बाजूने मतदान होणार आहे, त्या मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्या आहेत, असा दावा कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -