नवी दिल्ली : जुने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड 31 डिसेंबरपर्यंत EMV कार्डमध्ये बदलून न घेतल्यास 1 जानेवारीपासून एटीएम कार्ड बंद होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. जुनं मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड हे सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं कळतयं. रिझर्व्ह बॅंकेनं 2015 मध्येच जुने एटीएम, डेबिट कार्ड EMV मध्ये बदलून घेण्याचे आवाहन केले होते.

EMV कार्ड म्हणजे काय?

EMV स्मार्ट पेमेंट कार्ड असतात. ज्यात मॅग्नेटिक स्ट्राईप्सच्या जागी इंटिग्रेटेड सर्किटमध्ये डेटा स्टोअर होतो. या कार्डला चिप कार्ड आणि आयसी कार्ड असंही म्हणलं जातं. याने जेवढ्या वेळेस व्यवहार केला जाईल, तेवढ्या वेळेस डायनामिक डाटा तयार जाईल. या कार्डचा डुप्लीकेट कार्ड बनवता येणार नाही, आणि कॉपीही करु शकणार नाही. त्यामुळे एटीएम कार्डसंबंधी गुन्हेगारीला आळा बसेल. या कार्डचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.

कसं ओळखाल EMV कार्ड?

तुमचं कार्ड ब्लॉक होणार आहे की नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम चिप तपासून पहा. त्यासाठी तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या उजव्या बाजूला EMV चिप आहे की नाही हे पाहावं लागेल. जर कार्डच्या उजव्या बाजूला त्यावर सिमकार्ड सारखी चिप असेल, तर कार्ड ब्लॉक होणार नाही. तसेच अशी चिप नसल्यास कार्ड जुनं असून, ते कार्ड 31 डिसेंबरपर्यंत ब्लॉक होणार आहे.

कार्ड बदलण्यासाठी संबंधित बॅंकाच्या शाखेत संपर्क करुन इंटरनेट बॅंकिंगच्या सहाह्याने EMV कार्ड मिळवता येईल. पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर कार्ड घरपोहोच मिळेल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.