भोपाळ : मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूक होण्याआधी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. आज मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने घोषणापत्र जाहीर केले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे घोषणापत्र जाहीर केले आहे. भाजपने या घोषणापत्राला 'दृष्टीपत्र' असे नाव दिले आहे.


या घोषणापत्रात महिलांपसून ते शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना आश्वासने देण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांबद्दलचे तपशीलदेखील दिले आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा याबद्दलही मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला आहे. यावेळी शिवराज सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रभात झा उपस्थित होते. भाजपने घोषणापत्रात महिला आणि शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिल्याचा दावा केला आहे.
घोषणापत्रात केलेल्या भाजपच्या घोषणा
गरीब नागरिकांसाठी पक्की घरं, स्वस्त वीज आणि मुलांचा शिक्षणासाठीची व्यवस्था करणार
शेतकऱ्यांच्या विकासासाठी 32 हजार 701 कोटी रूपये देण्यात आले आहेत.
शहरांना स्मार्ट सिटी तर ग्रामीण भागात स्मार्ट गावं बनवणार असल्याचा संकल्प
किमान एक हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये चांगले पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे
महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र पत्र तयार करण्यात आले आहे, स्व-मदत गटासाठी निधी तयार केला जाईल असा उल्लेख या संकल्प पत्रात करण्यात आला आहे
शाळेत मुलींना 75 टक्के गुण मिळाल्यानंतर स्कूटी देण्यात येणार
उच्च शिक्षणासाठी गरीब मुलांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणर नाही
युवकांसाठी 10 हजार लाख रोजगारांची निर्मिती करणार
आयटी, रिअल इस्टेट आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढवणार