लखनौ : उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सभापती रमेश यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झालाय. यावेळी जिथे मृतदेह सापडला त्या खोलीत आई आणि भाऊ उपस्थित होते. अभिजित असं या मुलाचं नाव आहे. झोपताना त्याच्या छातीत दुखत होतं, सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

हत्येचा आरोप आई मीरा यादव यांच्यावर केला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आईला अटक केली आहे. तर मीरा यादव यांनी पती रमेश यादव यांच्यावरच हत्येचा आरोप केला आहे. पोलीस सूत्रांच्या मते, आरोपी आईने सांगितलं, की मृत अभिजित मद्यधुंद अस्थेत राडा करायचा आणि मृत्यूपूर्वीही त्याने आईला मारहाण केली होती.

विधानपरिषदेचे सभापती रमेश यादव यांचे दोन लग्न झालेले आहेत. पहिली पत्नी प्रेमा देवी आहे, ज्या एटा जिल्ह्यात राहतात. त्यांचा मुलगा आशिष एटा सदरमधून आमदार होता. दुसरी पत्नी मीरा यादव आहे, जी राजधानी लखनौमधील दारुल शफा येथील बी ब्लॉकमध्ये राहते.

कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, मृत अभिजित रात्री अकरा वाजता घरी आला होता. झोपताना त्याच्या छातीत दुखत होतं. याची माहिती त्याने आईला दिली होती. सकाळी बराच वेळ तो उठला नसल्याने जाऊन पाहिलं तर तो मृतावस्थेत आढळून आला.