श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. यावेळी झालेल्या चकमकीत तीन भारतीय जवानही शहीद झाले आहेत. एक जवान जखमी असून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.


जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरू होता. यावेळी सतर्क झालेल्या भारतीय जवानांनी दोन घुसखोरांना ठार केलं. मारले गेलेले घुसखोर बॉर्डर अॅक्शन टीमचे (बॅट) सदस्य असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी सेनेचा जवान आणि प्रशिक्षीत दहशतवादी सहभागी असल्याचंही समोर येत आहे.


नियंत्रण रेषेजवळ सुंदरबनी सेक्टरमध्ये शस्त्रांसह दोन घुसखोर आणि भारतीय जवानांमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमारास चकमक झाली. या चकमकीत दोन घुसखोरांना ठार करण्यात जवानांना यश आलं असून दोन एके-47 रायफलसह अनेक हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. याठिकाणी शोध मोहिम सुरू असल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.


या चकमकीत तीन जवानही शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल  करण्यात आल्याचीही माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.


याआधी आज कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं. तर कुलगाममधील चकमकीत सात नागरिकांचाही मृत्यू झाला होता.