जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये मागील तीन दिवसात दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले. पाच फेब्रुवारीपासून आतापर्यंत 14 जवान शहीद झाले आहेत. तर यावर्षी 44 दिवसात 26 जवानांना वीरगती प्राप्त झाली. पण सरकारकडून फक्त पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावलं जात आहे.


काल (सोमवार) संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी सुंजवाँ येथील लष्करी तळाला भेट दिली आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेतली. 'पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल. आम्ही  जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही.' असं त्या यावेळी म्हणाल्या.

एकीकडे भारत सरकारकडून पाकिस्तानला कडक शब्दात सुनावलं जात असलं तरी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतावर वारंवार हल्ले सुरु आहेत.

44 दिवसात 26 जवान शहीद :

31 डिसेंबर 2017 : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये अवंतिपुरा सेक्टरच्या लेथपोरा भागात सीआरपीएफच्या कमांडो ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांचा हल्ला, पाच जवान शहीद

3 जानेवारी 2018 : जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाचा एक जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद

6 जानेवारी 2018 : जम्मू-काश्मीरच्या सोपोर शहरात दहशतवाद्यांकडून आयईडी स्फोट घडवण्यात आला. ज्यामध्ये चार पोलीस जवान शहीद झाले. तसेच अनेक पोलीस जखमी झाले.

13 जानेवारी 2018 : सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मुळचे धुळाचे असणारे लान्स नायक योगेश भदाणे शहीद

18 जानेवारी 2018 : जम्मू-काश्मीरच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्सटेबल शहीद

19 जानेवारी 2018 : पाकिस्तानने सीमारेषेजवळ तब्बल 40 ठिकाणी गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला. तर काही नागरिकांचाही मृत्यू झाला.

20 जानेवारी 2018 : जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन सुरक्षा रक्षक शहीद

4 फेब्रुवारी 2018 : पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ जोरदार गोळीबार, 4 जवान शहीद

11 फेब्रुवारी 2018 : जम्मूच्या सुंजवाँमध्ये लष्कराच्या तळावर हल्ला, ज्यामध्ये लष्कराचे पाच जवान शहीद झाले. तर एका जवानाच्या वडिलांचाही गोळीबारात मृत्यू झाला.

12 फेब्रुवारी 2018 : श्रीनगरच्या करण नगरमधील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न, यामध्ये सीआरपीएफचा एका कॉन्सटेबल शहीद