नवी दिल्ली : काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते मणिशंकर अय्यर आणखी एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं आहेत. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची तयारी आहे, मात्र भारताची नाही, असं वक्तव्य अय्यर यांनी कराची लिट फेस्टिव्हलमध्ये केलं.


'भारत आणि पाकिस्तान या देशांतील संबंध सुधारण्यासाठी सातत्याने आणि कुठल्याही अडथळ्याविना बातचित होणं, हा एकच मार्ग आहे. पाकिस्तानने हे धोरण स्वीकारल्याचा मला अभिमान आहे, मात्र भारताने ते स्वीकारले नसल्याचं दुःख आहे' असं मणिशंकर अय्यर म्हणाले.

'माझं भारतावर जितकं प्रेम आहे, तितकंच पाकिस्तानवरही आहे' अशा शब्दात अय्यर यांनी पाकिस्तानची तारीफ केली. 'शेजारी देशावरही मातृभूमीप्रमाणे प्रेम करा' असा सल्लाही मणिशंकर अय्यर यांनी भारताला दिला.

अय्यर यांच्या वक्तव्यानंतर कराची लिट फेस्टमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यापूर्वी गुजरात निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान मोदींवर टीका करुन अय्यर यांनी वाद ओढावून घेतला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षातून त्यांचं निलंबन करण्यात आलं.