लखनौ : उत्तर प्रदेशात सरकार बदलल्यापासून भगवीकरण सुरु आहे. मुख्यमंत्री कार्यालय ते सरकारी वाहनं आणि सरकारी कॅलेंडरपासून ते डायरीपर्यंत भगव्या रंगाचा वापर केला जात आहे. आता लखनौतील हज हाऊसलाही भगवा रंग देण्यात आला आहे.


जवळपास सर्व सरकारी कार्यालयांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आवडता भगवा रंग चढला असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सचिवालयानंतर आता उत्तर प्रदेश हज कमिटीच्या कार्यलयाच्या भिंतींनाही भगवा रंग दिला जात आहे. आतापर्यंत या भिंती पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या होत्या.

भगवा रंग हा ऊर्जेचं प्रतिक आहे, त्यामुळे यावर वाद होऊ नये, असं उत्तर प्रदेशचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसिन राजा यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात अनेक सरकारी बसेसनाही भगवा रंग देण्यात आला आहे, ज्याला खुद्द योगी आदित्यनाथ यांनी गेल्या महिन्यात हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं होतं.

उत्तर प्रदेश सरकारकडून दरवर्षी एक सूचना डायरी प्रसिद्द केली जाते, ज्याची किंमत 120 रुपये आहे. सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांना ही डायरी मोफत दिली जाते. ही डायरीही आता भगव्या रंगाची झाली आहे. सध्या जेवढे सरकारी कार्यक्रम होतात, त्यामध्ये व्यासपीठापासून ते सोफ्यापर्यंत भगव्या रंगाचा वापर केला जातो.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर कार्यालयाचे पडदेही भगव्या रंगाचे घेतले आहेत. शिवाय काही सरकारी रुग्णालयांमध्ये बेडच्या चादरीही भगव्या आहेत. योगी आदित्यनाथ स्वतः भगव्या रंगाचे कपडे वापरतात. ते जिथेही जातात, तिथे त्यांच्या खुर्चीवर भगव्या रंगाचा टॉवेल टाकला जातो.

उत्तर प्रदेशात ज्या पक्षाचं सरकार असतं, रंगही त्याचप्रमाणे बदलतो. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांचं सरकार होतं तेव्हा सर्व कामकाज हिरव्या रंगात होत होतं. तर मायावती यांचं सरकार असताना निळ्या रंगाचा बोलबाला होता. आता उत्तर प्रदेशात भगवीकरण सुरु आहे.