नवी दिल्ली: 'पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम असल्याच सांगत आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू.' अशा भाषेत लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी पाकिस्तानला उत्तर दिलं आहे.
जम्मू काश्मीरमधील उरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लष्कर छावणी परिसरातील शोधकार्य पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या शोधकार्यात ४ एके रायफल्स, ४ हातबॉम्ब प्रक्षेपक तसेच ४ ग्रेनेड लॉन्चर सापडली आहेत. ही सर्व हत्यारे पाकिस्तानी बनावटीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर दिवसभर दिल्लीत घडामोडींना वेग आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी हल्लाची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना दिली. राष्ट्रपती भवनात जाऊन मोदींनी प्रणव मुखर्जींना माहिती दिली.
याशिवाय पाकिस्तानविरोधात कारवाई कऱण्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याची माहितीही समोर येते आहे. याशिवाय पाकिस्तानवर कारवाईचा निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल. त्यानंतर निर्णय होणार आहे.