नवी दिल्ली : विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर 86 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता विनाअनुदानित गॅस सिलेंडर 737.50 रुपयांना मिळणार आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात सिलेंडरचे दर वधारल्याने भारतातही किंमतीत वाढ करण्यात आल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे.

ज्या ग्राहकांनी गॅस अनुदान सोडलं आहे किंवा ज्या ग्राहकांचा वर्षभरातील 12 अनुदानित सिलेंडरचा कोटा पूर्ण झाला आहे, त्यांना विनाअनुदानित गॅस सिलेंडर 737.50 रुपयांमध्ये खरेदी करावा लागणार आहे.

सप्टेंबर 2016 पासून एलपीजी सिलेंडर 271 रुपयांनी महाग

विनाअनुदानित गॅस सिलेंडरची दरवाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. याआधी 1 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरचे दर 66.50 रुपयांनी वधारले होते. विनाअनुदानित 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरचे दर कालपर्यंत 650.50 रुपये होते.

तर सप्टेंबर 2016 मध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 466.50 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत गॅस सिलेंडरच्या दरात सहा वेळा वाढ करण्यात आली आहे. सप्टेंबर 2016 नंतर आतापर्यंत एलपीजी सिलेंडर 58% म्हणजेच 271 रुपयांनी महागला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थाचे दर ऑक्टोबर 2016 पासून वाढत आहेत.

अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात किरकोळ वाढ

तेल कंपन्यांनी अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातही 13 पैशांची किरकोळ वाढ केली आहे. त्यामुळे त्याचे दर आता 434.93 रुपये झाले आहेत. याआधी 1 फेब्रुवारीमध्ये अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 9 पैशांची वाढ करण्यात आली होती. दोन किरकोळ वाढीच्या आधी अनुदानित गॅस सिलेंडरचे दर 8 वेळा वाढले असून, प्रत्येक वेळी किमान 2 रुपयांची वाढ झाली आहे.

विमान इंधनाचे दरही वधारले

यासोबतच तेल कंपन्यांनी विमान इंधनाचे दरही 214 रुपये प्रति किलोलिटर वाढवल्याने, त्याचा दर 54,293.38 रुपये झाला आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी विमान इंधनाच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ केली होती.