नवी दिल्ली : चिमुकल्यांच्या तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस जुही चौधरीला आज पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने जुहीला 12 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.
भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस जुही चौधरी यांना सीआयडीने काल अटक केली होती. त्यानंतर भाजपकडून जुही चौधरी यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
सीआयडीने काल रात्री जुहीला भारत-नेपाळ सीमेवरुन अटक केले होते.
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये विमला शिशू गृह चालवणारी चंदना चक्रवर्ती नामक महिलेने जुही चौधरीचं नाव सांगितलं होतं. त्यानंतर कारवाई करण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी चंदना चक्रवर्तीने भाजप खासदार रुपा गांगुली आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. चंदनाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसात जुहीने या दोन नेत्यांशी चर्चा केली होती.
कैलाश विजयवर्गीय यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत, त्यांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. निष्पक्ष एजन्सीकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणीही विजयवर्गीय यांनी केली आहे. तर दुसरीकडे खासदार रुपा गांगुली यांनीही आरोप फेटाळले आहेत.
सीआयडीने या प्रकरणात सर्वात आधी एनजीओच्या चीफ अॅडॉप्शन ऑफिसर सोनाली मंडल, अध्यक्ष चंदना चक्रवर्ती आणि चंदनाचा भाऊ मानस भौमिक यांना अटक केली.