नवी दिल्ली: नेहमीच गोंधळानं गाजणाऱ्या संसदेत आज मात्र सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत पाहायला मिळालं. सर्वच पक्षाचे खासदार एका खास गोष्टीसाठी एकत्र आले आणि त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या.


अर्थात निमित्त होतं लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या वाढदिवसाचं.

सुमित्रा महाजन यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं संसदेच्या सर्वच सदस्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सत्ताधारी भाजप असो वा विरोधी पक्षातील काँग्रेस असो सर्वच पक्षाच्या खासदारांनी सुमित्रा महाजन यांना शुभेच्छा दिल्या

https://twitter.com/DDNewsLive/status/852037143580901380

कोकणात जन्म

सुमित्रा महाजन यांचा जन्म 12 एप्रिल 1943 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथं साठे कुटुंबात झाला. 

साठ वर्षापूर्वीच्या चिपळुणातील बापट आळी ते चिंचनाका या दरम्यान साठे कुटुंबाचं निवासस्थान होतं. सुमित्रा महाजन यांचं प्राथमिक शिक्षण बापट आळीतील कन्या शाळेत झालं.

शालेय जीवनापासूनच सुमित्रांकडे अंत्यत हुशार मुलगी म्हणून पाहिल जातं होतं. अभ्यासाबरोबर संगीत, नृत्य, कथाकथन, नाटकं अशा प्रत्येक कलाप्रकारात सुमित्रा या नेहमीच आघाडीवर असत.

शालेय शिक्षणानंतर महाजनाचं पुढचं शिक्षण चिपळुणातल्याच युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झालं. याठिकाणी त्यांनी आठवी ते जुनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं.

सुमित्रा महाजन या लग्नानंतर इंदूरमध्ये स्थायिक झाल्या. त्यांनी इंदूरमधूनच सलग पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोकसभेत प्रतिनिधीत्व  केलं.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांची लोकसभाअध्यक्ष म्हणून निवड झाली.

सुमित्रा महाजन या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला लोकसभाध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या. ज्याचा चिपळूणकरांबरोबरच प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे.