चेन्नई : प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मैयम पार्टी (एमएनएम) चे संस्थापक कमल हासन यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. नथुराम गोडसे असं त्याचं आहे, असं वादग्रस्त वक्तव्य कमल हासन यांनी केलं. तामिळनाडू अरावाकुरुची विधानसभा क्षेत्रात प्रचारादरम्यान बोलत होते.
नथुराम गोडसेने महात्मा गांधीची हत्या केली होती. याविषयी बोलताना कमल हासन पुढे म्हणाले की, "या परिसरात मुस्लीम मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणून मी असं म्हणत नाही. तर मी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर असं म्हणत आहे. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाली."
मला असा भारत अपेक्षित आहे, ज्यामध्ये सर्वांना समान मानलं गेलं पाहिजे. मी चांगला भारतीय आहे आणि मला तेच हवं आहे, असंही कमल हासन यांनी म्हटलं. कमल हासन यांनी 21 फेब्रुवारी 2018 मध्ये मक्कल निधी मैयम पार्टी (एमएनएम) या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. ग्रामीण तामिळनाडूचा विकास आणि भ्रष्टाचाराविरोधात आमचा पक्ष काम करेल असं पक्ष स्थापनेवेळी कमल हासन यांनी म्हटलं होतं.
नथुराम गोडसेने 1948 मध्ये महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. नथुराम गोडसेवरुन नेहमीच वाद निर्माण होत असतात. देशातील काही भागात तर नथुराम गोडसेची मंदिरेही आहेत, जेथे त्याची पूजा केली जाते. भाजप आणि आरएसएस नथुराम गोडसेची विचारधारा जपत असल्याचं काँग्रेसकडून नेहमीच बोललं जातं. अशा आरोपांमुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आरएसएसने मानहाणीचा दावाही केला आहे.
कोण होता नथुराम गोडसे?
नथुराम गोडसेने पुण्याजवळ बारामती येथे प्राथमिक शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी त्याने हायस्कूलचे शिक्षण मध्यावरच सोडलं. नथुराम गोडसे सुरुवातीला अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सक्रिय होता. मात्र नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 1930 अखिल भारतीय हिंदू महासभेत गेला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली त्यावेळी झालेल्या धार्मिक दंगलींमुळे नथुराम गोडसे दु:खी झाला होता. या दंगलींसाठी नथुराम गोडसे महात्मा गांधींना जवाबदार मानत होता. त्यामुळेच त्याने चिडून आपल्या साथिदारांसह महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचला.
त्यानुसार 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनात गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. गांधींजींच्या हत्येप्रकरमी नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.