शीख दंगलीच्या कटू आठवणी आणि दुःख विसरणे कठीण आहे. माझी आई सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही माफी मागितली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
पित्रोदा यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ‘1984 मध्ये जे झालं ते झालं, तुम्ही 5 वर्षात काय केलं ते सांगा? असं म्हणत प्रश्न उपस्थित केले होते.
1984 च्या दंगलीमुळं खूप त्रास झाला : राहुल
राहुल गांधी म्हणाले की, "मला वाटतं सॅम पित्रोदा यांचं मत पक्षाच्या विचारधारेच्या वेगळं आहे, यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे. 1984 सालच्या या दंगलीमुळे खूप त्रास झाला. न्याय व्हायला हवा. यासाठी जबाबदार असलेल्या अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी."
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या प्रकरणी माफी मागितली. माझी आई सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. ही दंगल आपल्यासाठी एक मोठी दुर्घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
84 दंगलीच्या वक्तव्यावर सॅम पित्रोदांनी माफी मागितली
दरम्यान पित्रोदा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून भाजप आपल्या कमजोऱ्या लपविण्यासाठी शब्दच्छल करत आहे, असे ते म्हणाले. दंगलीसंदर्भात प्रश्न विचारला असता पित्रोदा यांनी गुरुवारी आता 1984 सालच काय आहे? तुम्ही पाच वर्षात काय केलं ते सांगा. 1984 मध्ये जे झालं ते झालं, आताच बोला, असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर भाजपने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी हात जोडून माफी मागावी आणि पित्रोदा यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली होती.