Lok Sabha Election Phase 7 Voting: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात (Lok Sabha Election Phase Seven Voting) आज सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात वाराणसी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.


सातव्या टप्प्यात केंद्रशासित प्रदेश चंदीगड, पंजाबमधील सर्व 13 लोकसभा, हिमाचल प्रदेशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिशातील 6 आणि झारखंडमधील 3 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. ओडिशाच्या उर्वरित 42 विधानसभा जागांसाठी आणि हिमाचल प्रदेशच्या सहा विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकाही एकाच वेळी होणार आहेत. सातव्या टप्प्यात जवळपास 5.24 कोटी पुरुष, 4.82 कोटी महिला आणि 3574 हजार तृतीयपंथीसह एकुण 10.06 कोटी लोक आज मतदान करण्यासाठी पात्र आहेत. 


अनेक दिग्गज मैदानात-


पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन केंद्रीय मंत्री राजकुमार सिंग आणि अनुराग ठाकूर रिंगणात आहेत. या टप्प्यात चार कलाकार रिंगणात आहेत, ज्यामध्ये कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद हे देखील निवडणूक लढवत आहेत.


अभिषेक बॅनर्जीही मैदानात-


तृणमूल काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दक्षिण बंगालमध्ये आज मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील दमदम, बारासात, बशीरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जाधवपूर, कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर या जागांवर मतदान होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने या सर्व जागा जिंकल्या होत्या. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून निवडणूक लढवत आहेत. दोन वेळा खासदार राहिलेले अभिषेक बॅनर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिकूर रहमान आणि भाजपचे अभिजित दास यांच्याशी लढत आहेत.


उत्तर प्रदेशात थेट लढत


उत्तर प्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडीतील सदस्य समाजवादी पार्टी, काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. तृणमूल काँग्रेसचा पारंपरिक गड असलेल्या दक्षिण बंगालमध्ये 'जुने विरुद्ध नवीन' सत्तासंघर्ष दिसून येणार आहे. पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल 1996 नंतर प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, तर इंडिया आघाडीतील दोन पक्ष काँग्रेस आणि आप यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत.


बिहारमध्ये कुठे मतदान?


बिहारमधील या टप्प्यात सासाराम, नालंदा, पटना साहिब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर, करकत आणि जेहानाबाद येथे मतदान होणार आहे, जेथे सुमारे 1.62 कोटी मतदार 134 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवतील. राज्यात, केंद्रीय मंत्री आरके सिंग अराहमधून विजयाची 'हॅट-ट्रिक' करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेथे त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी सीपीआय (एमएल) आमदार सुदामा प्रसाद हे बसले आहेत. भाजपचे ज्येष्ठ खासदार रविशंकर प्रसाद पाटणा साहिबमधून उमेदवार असून त्यांचा सामना काँग्रेसचे प्रवक्ते अंशुल अभिजीत यांच्याशी आहे. मीसा भारती पाटलीपुत्रमध्ये तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहे. या जागेवर भाजप खासदार रामकृपाल यादव विजयाची 'हॅट्ट्रिक' करण्याचा प्रयत्न करत आहेत.


संबंधित बातमी:


Election Commission : आचारसंहिता लागू, नेमकं कोणकोणत्या कामावर बंदी, नियम डावलल्यास शिक्षा काय?