नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पहिल्या उमेदवार यादीची प्रतीक्षा असतानाच अवघ्या 24 तासांमध्ये दोन खासदारांनी राजकारणाला तडकाफडकी रामराम केल्याने खळबळ उडाली आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि जयंत सिन्हा (Jayant Sinha) या दोन भाजप खासदारांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. गंभीरने पुन्हा क्रिकेटशी निगडीत बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. जयंत सिन्हा यांनी राजकारणातून बाजूला होत भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेन, असे म्हटले आहे. 


जयंत सिन्हांचा राजकारणाला रामराम 


लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉन बैठकीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने सुमारे 16 राज्यांच्या नावांवर चर्चा केली. पहिल्या यादीत अनेक दिग्गजांची नावे येऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये तिकिट कापल्यानंतरही नाराजी उफाळण्याची चिन्हे आहेत. हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा यांनी निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी केली आहे. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या थेट निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेन.






गंभीरने सुद्धा सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला


याआधी खासदार गौतम गंभीरने असेच ट्विट करून जेपी नड्डा यांना निवडणूक ड्युटीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीनंतर काही तासांनी जयंत सिन्हा यांनीही ट्विट करून अशीच मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये आर्थिक आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहीन, असे ते म्हणाले. गेली दहा वर्षे भारतातील आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळाले. त्यांनी लिहिले की, 'याशिवाय, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेतृत्वाने दिलेल्या अनेक संधींचा आशीर्वाद मिळाला आहे. त्या सर्वांचे माझे मनःपूर्वक आभार. जय हिंद.'






दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे विद्यमान खासदार गौतम गंभीरने सुद्धा सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून भाजप खासदार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आज आपली पहिली यादी जाहीर करू शकते. यावेळी अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


गौतम गंभीरने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, "मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली आहे. मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करावे, जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे आभारी आहे. आदरणीय, मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी गृहमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो, जय हिंद!”


गौतम गंभीरने 22 मार्च 2019 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. गौतम गंभीरने आम आदमी पार्टीचे आतिशी आणि काँग्रेसचे अरविंदर सिंग लवली यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती. गंभीरने 2014 मध्ये फौंडेशनची स्थापना केली होती. दिल्लीत कोणीही उपाशी झोपू नये हा या फौंडेशनचा उद्देश होता. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, 2017 मध्ये पटेल नगर, दिल्लीत एक सामुदायिक स्वयंपाकघर स्थापन करण्यात आले. फौंडेशनचा मुख्य प्रकल्प निमलष्करी शहीदांच्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक गरजा पूर्ण करून त्यांना सक्षम करणे हा आहे. याव्यतिरिक्त, GGF पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वंचित घरांतील किशोरवयीन मुलींसोबत काम करते आणि शहरातील वायू प्रदूषणाशी लढण्यासाठी वृक्षारोपण करून हरित दिल्ली करण्याचा प्रयत्न करते.


इतर महत्वाच्या बातम्या