Crime News : महिला अत्याचाराच्या घटना काही थांबता थांबत नसल्याचे चित्र असतानाच, आता स्पेनहून (Spain) भारतात (India) आलेल्या महिला पर्यटकावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी (1 मार्च) रात्री उशिरा एका स्पेनच्या महिलेवर सामूहिक बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. ही महिला आपल्या पतीसोबत भारताच्या दौऱ्यावर आली होती. असे असतानाच झारखंडमधील (Jharkhand) दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिघांना ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीसह संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
जारमंडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुमार यांनी सांगितले की, स्पेनच्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना शुक्रवारी रात्री घडली. याशिवाय उर्वरित माहिती नंतर दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्री हे जोडपे बांगलादेशहून बाईकवरून दुमका येथे पोहोचले होते. तेथून बिहार आणि नंतर नेपाळला जाणार होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हंसडीहा बाजारापूर्वी कुंजी-कुरुमहाट नावाच्या ठिकाणी ते तंबू ठोकून मुक्कामी थांबले होते.
आरोपींमध्ये 7-8 तरुणांचा सहभाग
तंबू ठोकून मुक्कामी असलेल्या या स्पेनच्या महिलेवर सात ते आठ स्थानिक तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये होते त्या दिवशी ही कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आपल्या याच दौऱ्यात झारखंड राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाबाबत पंतप्रधान मोदी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती.
भाजपने राज्य सरकारवर साधला निशाणा
याप्रकरणी भाजप आमदार अनंत ओझा म्हणाले की, "हा राज्याला लागलेला कलंक आहे. यावरून राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था दिसून येते. राज्यात परदेशी नागरिकही सुरक्षित नाहीत. पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि सरकारनेही याची दखल घ्यावी. अशा अराजकतावाद्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी देखील आमदार ओझा यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :