नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक  पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले गेले. त्यात प्रामुख्याने देशभरात 75 नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. तसेचं कोळसा खाण क्षेत्र, छोट्या-मोठ्या उद्योग यांमध्ये100 टक्के तर डिजिटल मीडिया क्षेत्रात 26 टक्के एफडीआयला मंजूरी देण्यात आली आहे.

75 नवीन मेडिकल कॉलेजसाठी 24 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे मेडिकलच्या जागाही वाढणार आहेत. देशभरात तब्बल 15 हजार 700 जागा या निर्णयामुळे वाढणार आहे. 2021- 22 पर्यंत ही कॉलेज सुरु करणार असल्याचं जावडेकर म्हणाले. गेल्या पाच वर्षात एमबीबीएस आणि पीजीच्या 45 हजार जागा वाढवल्या गेल्या. तसेच 82 कॉलेजेसना मंजूरी देण्यात आली होती आणि आज 75 कॉलेजेसना मंजूरी दिली.

ऊस उत्पादक शेतकरी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणासुद्धा जावडेकर यांनी केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे 10 रुपये 30 पैसे मिळणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एफडीआय

याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने कोळसा खाण क्षेत्रात 100 टक्के एफडीआयच्या गुंतवणुकीला मंजूरी देण्यात आली आहे. तसेचं  डिजिटल मीडिया क्षेत्रात 26 टक्के एफडीआयला दिली आहे.  तसेच छोट्या-मोठ्या विविध प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगवर 100 टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे. भारताला मॅन्युफॅक्चरिंगचं हब बनविण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं गोयल म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना को श्रद्धांजली वाहण्यात आली.