इमर्जन्सी ब्रेक मारला, पण दगडफेकीमुळे ट्रेन पुढे नेली, लोको पायलटचं उत्तर

रेल्वे रुळावर लोकांना पाहून इमर्जन्सी ब्रेक दाबला होता, मात्र लोकांनी गाडीवर दगडफेक केल्याने गाडी पुढे न्यावी लागली. असं लेखी उत्तर अमृतसरमधील अपघातग्रस्त डीएमयू ट्रेनच्या लोको पायलटने दिलं आहे.

Continues below advertisement
अमृतसर | रेल्वे रुळावर लोकांना पाहून इमर्जन्सी ब्रेक दाबला होता, मात्र लोकांनी गाडीवर दगडफेक केल्याने गाडी पुढे न्यावी लागली. असं लेखी उत्तर अमृतसरमधील अपघातग्रस्त डीएमयू ट्रेनच्या लोको पायलटने दिलं आहे. अमृतसरमधील जोडा फाटक परिसरात शुक्रवारी रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी अपघात झाला होता. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचललं असून गाडी पुढे नेल्याचंही त्याने लेखी उत्तरात नमूद केलं आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये दसऱ्याला भीषण अपघात झाला. अमृतसरच्या जोडा फाटक परिसरात रावण दहन पाहणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवलं. हे लोक ट्रॅकवर रावण दहन पाहत असताना तिथे डीएमयू ट्रेन त्यांच्यासाठी काळ बनून आली. अवघ्या पाच सेकंदात चहुकडे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. अपघातातील मृतांचा आकडा 61 वर पोहोचला आहे तर 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आयुक्तांनी मृत आणि जखमींच्या संख्येला दुजोरा दिला आहे. रेल्वे अपघातातील जखमींना तरणतारण, जालंधर, गुरदासपूर आणि अमृतसरमध्ये उपचार सुरु आहेत. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कसा झाला अपघात? अमृतसरमधील जोडा फाटक परिसरात शुक्रवारी रावण दहन आणि फटाके फुटल्यानंतर गर्दीपैकी काही लोक रेल्वे रुळावर आले. रुळावर आधीपासूनच मोठ्या संख्येने लोक रावण दहन पाहत होते. संध्याकाळी सातच्या सुमार जोडा फाटकवरुन डीएमयू ट्रेन आली. ही डीएमयू ट्रेन जालंधरहून अमृतसरला जात होती. ही भरधाव ट्रेन रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवत निघून गेली. रावण दहनाच्या वेळी फटाक्याच्या आवाजामुळे ट्रेन आल्याचं समजलं नाही आणि हा दुर्दैवी अपघात झाला.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola