शिमला : 'शिमला आणि कुलू मनाली' हे देशभरातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण. रोजच्या खाण्यातील शिमला मिर्चीपासून अगदी 'लव्ह इन शिमला' या सिनेमापर्यंत 'शिमला' हे नाव गाजलं. मात्र प्रत्येकाच्या ओठी बसलेलं हे नाव आता बदलण्याची चिन्हं आहेत. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत संकेत दिले आहेत.
शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी शिमल्यासह काही ठिकाणांची नावं बदलण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र आता शिमल्याचं नाव 'श्यामला' असं बदलण्यात येणार आहे.
हिमाचल प्रदेशमधील अनेक पौराणिक ठिकाणांची नावं इंग्रजांनी बदलली. रिज, स्कँडल पॉईंट, पीटरहॉप, डलहौसी, व्हॉईसराय गिल अॅडव्हान्स स्टडी या ठिकाणांची नावंही बदलण्यात येणार आहेत. इंग्रजांनी चुकीच्या पद्धतीने बदलेली नावं जनतेच्या सूचनेनुसार बदलण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नुकतंच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यराज यांनी 'अलाहाबाद'चं 'प्रयागराज' असं नामांतर केलं. त्यानंतर इतर राज्यांमध्येही बदलाचं वारं वाहू लागलेलं दिसत आहे.