नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लॉकडाऊन 1 च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज (14 एप्रिल) देशाला उद्देशू भाषण केलं. यावेळी त्यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, "देशातील अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनीही भारतातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात येत आहे."


लॉकडाऊन वाढवण्यासोबतच पंतप्रधानांनी देशातील जनतेला सप्तपदींचं पालन करण्याचं आवाहन केलं. "धीर ठेवला, नियमांचं पालन केलं तर कोरोनासारख्या साथीच्या रोगावरही मात करु. या विश्वासासोबत मला सात गोष्टींमध्ये तुमची साथ आवश्यक आहे," असं मोदी म्हणाले.


Lockdown2 | 3 मेपर्यंत भारत लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी


काय आहे मोदींची सप्तपदी?


पहिली 
आपल्या घरातील वृद्धांची अधिक काळजी घ्या, विशेषत: ज्यांना जुने आजार आहेत, त्यांची अधिक काळजी घेऊन त्यांना कोरोनापासून वाचवायचं आहे.


दुसरी 
लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं पूर्णत: पालन करा. मास्क वापरा, घरात बनवलेले मास्क वापरले तर उत्तम


तिसरी 
आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांचं पालन करा, गरम पाणी, काढा यांचं कायम सेवन करा.


चौथी 
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात मदत करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अॅप अवश्य डाऊनलोड करा. हे अॅड डाऊनलोड करण्यासाठी इतरांनाही प्रेरित करा


पाचवी 
शक्य तेवढ्या गरीब कुटुंबाची देखरेख करा. त्यांच्या जेवणाची गरज पूर्ण करा


सहावी 
तुमच्या व्यवसायात, उद्योगात काम करणाऱ्या लोकांच्या प्रति संवेदनशील राहावं. कोणालाही कामावरुन काढू नका


सातवी 
देशाचे कोरोना योद्धे, आपले डॉक्टर-नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांचा पूर्ण आदर, सन्मान करा


लॉकडाऊनची घोषणा करताना मोदी काय म्हणाले?
लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मोदी म्हणाले की, "3 मे पर्यंत आपल्या सर्वांना, देशाच्या प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनमध्येच राहावं लागणार आहे. या दरम्यान आपल्याला त्याचप्रकारे पालन करायचं आहे, जसं आतापर्यंत करत आलो आहोत. आता कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ द्यायचा नाही. स्थानिक स्तरावर एक जरी रुग्ण वाढला तर तो चिंतेचा विषय असेल."


Corona Death Rate | महाराष्ट्राचा मृत्यूदर अधिक का? कोरोनाच्या मृत्यूदराच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना