मुंबई : पैशांची अफरातफर विरोधी नियमांनुसार बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याच्या वृत्ताचं आरबीआयने खंडन केलं आहे.


माध्यमांमध्ये कथित आरटीआयच्या आधारावर बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र यावर आता आरबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.

मनी लाँडरिंगच्या सुधारित काद्यानुसार बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. 1 जुलै 2017 ला याबाबत नियम जारी करण्यात आला होता. हा नियम संविधानिक असून बँकांनी कोणत्याही आदेशाच्या प्रतीक्षेविना अंमलबाजावणी करायची आहे, असं आरबीआयने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.

बँकेत खातं उघडण्यापूर्वी आणि 50 हजारांपेक्षा जास्तीचा व्यवहार करण्यासाठी सरकारने यावर्षीपासून आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. सध्याच्या बँक खात्यांनाही 31 डिसेंबरपूर्वी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. अन्यथा बँक खातं बंद केलं जाऊ शकतं.

एकापेक्षा अधिक पॅन कार्ड ठेवून कर चोरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी सरकारने 2017 च्या अर्थसंकल्पामध्येच पॅनसोबत आधारही बँक खात्याशी लिंक असावं, असं म्हटलं होतं.