नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दीपावलीचा उत्सव देशाच्या सैनिकांसोबत साजरा करण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीरमधील भारतीय सैनिकांच्या तळावर जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. यंदाच्या दिवाळीला पंतप्रधान मोदी सीमेवर कोणत्या ठिकाणी जाणार याची माहिती सुरक्षेच्या कारणात्सव देण्यात आलेली नाही.


पंतप्रधान मोदींनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देशातील जनतेला एक दिवा सैनिकांच्या नावे प्रज्वलित करण्याचं आवाहन केलं. त्यांनी ट्वीट करुन सांगितलं की "या दीपावलीला 'सल्यूट टू सोल्जर' म्हणून एक दिवा लावूया. सैनिकांच्या अद्भूत साहसाप्रती आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त केली जाऊ शकत नाह. सीमेवर तैनात जवानांच्या कुटुंबीयांचेही आम्ही आभारी आहोत, असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.





मोदींनी याआधी कुठे दिवाळी साजरी केली?
मागील वर्षी 27 ऑक्टोबर 2019 रोजी मोदींनी राजौरीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. पंतप्रधान मोदी सैन्याच्या युनिफॉर्ममध्ये सैनिकांमध्ये गेले होते. त्यांनी आधी शहीदांना आदरांजली वाहिली आणि मग सैनिकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये सैन्या आणि आयटीबीपी जवानांसोबत दीपावली साजरी केली. त्यावेळी त्यांनी जवानांना मिठाई भरुन त्यांचं मनोधैर्य वाढवलं होतं.


2017 मध्येही मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये बीएसएफ आणि भारतीय सैन्यांच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. तेव्हा त्यांनी पाकिस्तान कडक संदेश दिला होता. 2016 मध्ये नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशच्या आर्मी आणि डोगरा स्काऊट्सच्या जवानांमध्ये गेले होते. इथे मोदी जवानांना मित्रासारखे भेटले आणि त्यांच्यासोबत फोटोही काढला. 2015 मध्ये मोदींनी पंजाबमध्ये भारतीय सैनिकांसोबत दिवाळीची उत्सव साजरा केला होता. त्यावेळी त्यांनी 1965 मधील युद्धाच्या वॉर मेमोरिअलला भेट दिली होती. त्याआधी म्हणजेच 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदींनी सियाचिनमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.