लखनौ : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये मायलेकीवर झालेल्या गँगरेपमुळे देशभरात खळबळ माजली आहे. 'आपल्या पत्नी आणि मुलीला सरकारने नराधम बलात्काऱ्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी' अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.


 
'आपली 13 वर्षांची मुलगी गँगरेपच्या धक्क्यातून आयुष्यभर सावरु शकणार नाही. लहान वयात तिच्या मनावर मोठा ओरखडा उमटला आहे. त्यामुळे राजकारण्यांनी एकमेकांवरील गलिच्छ आरोप थांबवावेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आमच्या कुटुंबातील पीडित मायलेकीला सरकारने बलात्काऱ्यांना सर्वांसमक्ष ठार मारण्याची परवानगी द्यावी' असा आक्रोश पीडित कुटुंबाने केला आहे.

 
पंधरा आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आली असून तिघांची ओळख पटली आहे. पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपी 22 ते 35 वर्ष वयोगटातील असल्याचं कुटुंबाने सांगितलं आहे.

 

 

राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबाची लूट, मायलेकीवर गँगरेप



नॉएडाहून शाहजहांपूरला जाणाऱ्या कुटुंबावर शुक्रवारी रात्री ही दुर्दैवी वेळ ओढवली. नॅशनल हायवे क्रमांक 91 वर रात्री दीडच्या सुमारास काही नराधमांनी सायकलचं चाक फेकून या कुटुंबाची गाडी अडवली. कुटुंबातील पुरुषांना दोरखंडाने बांधून त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिने लुटले. त्यानंतर मायलेकीला त्यांनी शेतात खेचून नेलं. तिथेच दोघींवर सर्वांसमोर गँगरेप केला आणि आरोपींना पळ काढला. विशेष म्हणजे या गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर चार तास हे नाट्य रंगलं.

 
'आम्ही आमच्याकडील मौल्यवान वस्तू घेऊन जा, मात्र कोणालाही त्रास देऊ नका अशा विनवण्या करत होतो. इतकंच काय, त्यांच्या टोळक्यातील एकानेही इतरांना महिलांशी छेडछाड न करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याकडे कानाडोळा करत नराधमांनी गँगरेप केला' अशी माहितीही कुटुंबातील एकाने दिली आहे.

 
'नराधमांनी पळ काढल्यावर आम्ही कशीबशी आमची सुटका केली. पोलिसांना 100 क्रमांकावर फोन केला, तरी तो व्यस्त लागत होता. त्यानंतर आम्ही एका नातेवाईकाला फोन करुन हकिगत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला फोन केला आणि घटनेला खूप काळ लोटल्यावर ते घटनास्थळी आले' असंही पीडितेच्या काकांनी सांगितलं आहे.

 
पीडित मुलीला ताप भरला असून ती आणि तिची आई मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. दोषींवर दोन आठवड्यात कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा पीडितेच्या पतीने दिल्याची माहिती आहे.

 

 

कारमध्ये दोन भाऊ आणि दोघांच्या पत्नी, एका भावाचा 10 वर्षीय मुलगा आणि दुसऱ्या भावाची 13 वर्षीय मुलगी प्रवास करत होते. अवघ्या दहा दिवसांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झाल्यामुळे विधी करण्यासाठी हे कुटुंब गावी चाललं होतं. त्यावेळी धाकट्या भावाच्या पत्नी आणि मुलीवर हा अनर्थ ओढवला.