मुंबई : दुचाकी अपघातात पिलियन रायडर म्हणजेच दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तरी त्याचे कायदेशीर वारसदार दुचाकीच्या इन्शुरन्स कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी करु शकत नाहीत, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

नागपूरचे रहिवासी असलेल्या जमील अहमद यांचा 8 जुलै 1997 रोजी झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. जमील स्कूटरवर मागे बसलेले असताना एका जीपने त्यांच्या स्कूटरला चिरडलं होतं.

जमील त्यावेळी विदर्भ पेट्रोलियममध्ये कार्यरत असून दरमहा एक हजार 600 रुपये कमवत होते. या आधारे जमील यांच्या कुटुंबीयांनी मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात जाऊन विमा कंपनीकडे 2.94 लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती.

न्यायाधिकरणाने कुटुंबाचा दावा मान्य करत नॅशनल इन्शुअरन्स कंपनीला 22 ऑगस्ट 2006 रोजी 1.45 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र जमील हे पिलियन रायडर होते. थर्ड पार्टीसाठी कोणतंही हायर प्रीमियम भरल्याचे पुरावे नाहीत. त्यामुळे संबंधित पॉलिसीमध्ये ते कव्हर होत नसल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं.