नवी दिल्ली: दिल्ली विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत अभाविपच्या अमित तंवरची अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी प्रियंका छाबडी आणि सचिव पदी अंकित सांगवान यांची निवड झाली आहे. तर एका जागेवर NSUI च्या मोहित गरीड याची निवड झाली आहे.

 

तर दुसरीकडे देश विरोधी घोषणाबाजी झाल्याने प्रकाशझोतात आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही काल मतदान झाले असून या निवडणुकीचे निकाल उद्या येणार आहेत.

 

दिल्ली विद्यापीठाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव पदासाठी झालेल्या या निवडणुकीसाठी 51 कॉलेजमधून 117 बूथवर मतदान झाले. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक नियुक्त आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, चार पदांसाठी एकूण 17 उमेदवार रिंगणात होते.

 

यातील अध्यक्ष पदासाठी 7, उपाध्यक्ष पदासाठी 4 आणि सचिव आणि संयुक्त सचिव पदासाठी प्रत्येकी 3 उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल होते. या निवडणुकीत विद्यार्थी परिषदेच्या तीन उमेदवारांनी विजय मिळवला होता.

 

दिल्ली विदयापीठात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआय आणि रा. स्व. संघाची ABVP यांच्यातच मुख्य लढत होत होती. या निवडणुकीत 1 लाख 23 हजार 246 मतदारांनी मतदान केले. तर या निवडणुकीसाठी 300 ईव्हीएम मशिन वापरण्यात आले होते.

 

जेएनयूवर सर्वांचे लक्ष

फेब्रुवारी महिन्यामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या घटनेमुळे येथील विद्यार्थी संघटना प्रकाशझोतात आल्या. देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या निवडणुकीत कन्हैया कुमारच्या संघटनेने सहभाग घेतला नसला, तरी यावेळच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून आहे.

 

जेएनयूच्या सेंट्रल पॅनेलच्या 18 सदस्यांची निवड होणार असून यासाठी 79 उमेदवार मैदानात आहेत. तर 8600 मतदार त्यांचे भविष्य ठरवणार आहेत.