नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात काही व्यवहार आवश्यक समजून त्यांना सुट दिली गेली आहे. काहींना घरी बसून काम करण्याची सवलत मिळाली आहे. पण या सवलतीचा काहीजण कसा अर्थ लावतायत याचं एक भन्नाट आणि विचित्र उदाहरण राजस्थानमध्ये पाहायला मिळालं. राजस्थान हायकोर्टातील एक वकील चक्क बनियनवरच युक्तीवादाला उभे राहिले असल्याचा प्रकार समोर आला आहे. वकील महोदय बनियानवर युक्तिवादाला उभं राहिल्याचं दिसताच न्यायाधीशांनी सुनावनीच बंद केली.


लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक केसेसची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सनं करण्याची परवानगी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टांना दिली आहे. अशाच एका केसमध्ये सुनावणीसाठी कोर्टातून कॉन्फरन्स कॉल लावला गेला. तर वकील महाशय चक्क बनियनमध्येच युक्तीवादाला उभे राहिले. हे बघताच न्यायाधीशांचा पारा चढला आणि त्यांनी तातडीनं सुनावणी बंद केली.

राजस्थान हायकोर्टातले न्यायमूर्ती एस पी शर्मा हे क्रिमिनल केसेसचा निवाडा करत होते. दुपारी बारा वाजता आरोपी विनोदच्या केसचा नंबर आला. त्यावेळी कोर्टातून त्याच्या वकिलांना व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी फोन लावण्यात आला, तर हे वकील महाशय त्यावेळी बनियनमध्ये होते आणि तसेच युक्तीवादाला उभे राहिले. त्यांचा हा अवतार बघून न्यायमूर्तींनी तात्काळ व्हिडीओ कॉल कट केला आणि रागारागाने त्यांंनी याचिकाच फेटाळायचं ठरवलं. पण तिथं उपस्थित असलेल्या सरकारी अधिवक्त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी केसमध्ये पुढली तारीख दिली.

लॉकडाऊनमध्ये गैरसोय होऊ नये म्हणून सवलत दिली तर त्याचा असा गैरफायदा घेतला जात आहे. हायकोर्टाच्या गाईडलाईन्समध्येही युक्तीवादावेळी तुम्ही प्रॉपर ड्रेसमध्ये असला पाहिजेत असं म्हटलं आहे. पण तरीही असे प्रकार घडतायत. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये याच न्यायमूर्तींच्या बाबतीत महिनाभरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय. त्यामुळे आता बार असोसिएशनकडे नाराजी व्यक्त करत त्यांनी वकिलांना समज द्यायला सांगितलं आहे.

युनिफॉर्म हा सगळ्यांमध्ये समानता आणतो. वकील कितीही मोठा श्रीमंत असो एकदा गणवेश चढवला की सगळे एकाच पातळीवर येतात. राजस्थानमध्ये गर्मी वाढली असेल म्हणून वकिल महोदयांना कोट चढवणं शक्य झालं नसणार असं समर्थन कुणी करु शकत नाही. सोपं आणि सुटसुटीत वाटतंय म्हणून लष्कराचे जवान कधी टी शर्ट जीन्समध्ये पहारा देऊ शकतील का? किंवा डॉक्टर बर्मुडा घालून सर्जरी करतात का? त्यामुळे व्यावसायिक कर्तव्याचं भान हे असायलाच हवं.

वकीलांच्या वर्तनाचे असे नमुने फक्त आपल्या देशातच नाहीत. अमेरिकेतल्या फ्लोरिडा प्रांतात मागच्या महिन्यातच अशा घटना समोर आल्या होत्या. झूम अॅपवरुन युक्तीवाद सुरु असताना एक पुरुष वकील उघड्या अंगानेच युक्तीवादाला उभे राहिले तर एक महिला अॅटर्नी चक्क बेडवर अंथरुणातून बाहेर न पडताच सहभागी झाल्या होत्या.