नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होत आहे. त्यामुळं शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या आज सभा होणार आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्या दिवशी आपल्या वाराणसी लोकसभा मतदार संघात प्रचार करताना दिसतील.


उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी पूर्वेकडच्या 40 जागांसाठी 8 मार्च रोजी मतदान होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदार संघ वाराणसीचा समावेश असल्याने सर्वांचे लक्ष वाराणसीकडे लागून आहे.



पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, सलग तीन दिवसांपासून ते आपला मतदार संघ वाराणसीत तळ ठोकून आहेत. आजही त्यांची रोहनिया प्रचार रॅली होणार असून, प्रचार रॅली संपल्यानंतर ते दिल्लीकडे रवाना होतील.



तर दुसरीकडे मोदींना टक्कर देण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव, पत्नी डिंपल आणि राहुल गांधीही रोड शो करणार आहेत. या रोड शोनंतर अखिलेश यादव आणि राहुल गांधी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेणार आहेत.

शेवटच्या टप्प्यातील 40 जागांवर 2012 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. या निवडणुकीत समाजवादी पक्षाने या भागातून 23 जागांवर विजय मिळवला. तर बसपा 5, भाजप 4, काँग्रेस 3 आणि अपक्षांनी 5 जगांवर विजय मिळवला होता.

मात्र, यंदा समाजवादी पक्षासमोर भाजपचं तगडं आवाहन आहे. पंतप्रधान मोदींचाच मतदार संघ असलल्याने भाजपनेही आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. आता या भागातून भाजपला कितपत यश मिळेल? याकडे सर्व राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.  दरम्यान, उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 11 मार्च रोजी घोषित होणार आहेत.

संबंधित बातम्या

वाराणसीत मोदींचा रोड शो, सुरक्षेच्या कारणांकडे दुर्लक्ष?

BLOG : इलेक्शन डायरी : वाराणसीत तळ ठोकून का आहेत मोदी?

वाराणसीत पंतप्रधान मोदींचा 7 किमीचा मेगा रोड शो