Coronavirus Cases Today in India : देशात दिवसेंदिवस कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण देखील वाढत आहेत. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. तर मागील 24 तासात 315 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये 6.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5 हजार 753 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 14.78 टक्के आहे.
दरम्यान, काल देशात कोरोनाचे 2 लाख 47 हजार 417 नवीन रुग्ण आढळून आले होते. आज त्यामध्ये 16 हजार 785 रुग्णांची वाढ झाली आहे. म्हणजे दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 12 लाख 72 हजार 73 एवढी आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 85 हजार 350 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी 48 लाख 24 हजार 706 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. काल दिवसभरात 1 लाख 9 हजार 345 लोक कोरोनातून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
155 कोटी लसींचे डोस
सध्या देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. ज्या लोकांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात 155 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात 73 लाख 8 हजार 669 लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 155 कोटी 39 लाख 81 हजार 819 लसींचे डोस देण्यात आले आहेत.
ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5 हजार 753 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील जवळपास 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, तर त्यापाठोपाठ दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.