श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षाबलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी (06 जून) रात्री आणि शुक्रवारी (07 जून)सकाळी पुलवामात झालेल्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या एका चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. जवानांनी घटनास्थळावरुन तीन एके 47 जप्त केल्या आहेत. तसेच पुलवामामध्ये सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.


गुरुवारी पुलवामामधील लस्सीपोरा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षाबलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षाबलाच्या जवानांनी लस्सीपोरा भागात सर्च ऑपरेशन सुरु केले. याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला.

व्हिडीओ पाहा



दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर जवानांनी त्यास प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत चकमक सुरु होती. एका दहशतवाद्याला काल रात्री ठार करण्यात जवानांना यश मिळाले. तर उर्वरित तिघांना आज सकाळी कंठस्नान घातले.


दरम्यान सुरक्षाबलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबधित आहेत? त्यांची नावं काय? याबाबत तपास करत आहोत. तसेच या तपासात आणि दहशतवाद्यांविरोधात सुरु केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत यासाठी पुलवामामध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.