श्रीनगर : कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात रमजान ईदनिमित्त सुट्टी घेऊन घरी आलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, अज्ञात बंदूकधारी गुरुवारी सायंकाळी अनंतनाग जिल्ह्यातील सदुरा गावातील जवान मंजूर अहमद बेग यांच्या घरी आले होते. घरामध्येच या दहशतवाद्यांनी बेग यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे.


बेग यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते. निशस्त्र बेग यांच्यावर भ्याड हल्ला केला. गोळीबारात बेग गंभीर जखमी झाले. त्यानंतर बेग यांना त्यांचे कुटुबीय आणि शेजाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बेग हे सुट्टीवर येण्यापूर्वी शोपियान जिल्ह्यात तैनात होते. राष्ट्रीय रायफल्सच्या 34 व्या बटालियनमध्ये कार्यरत होते. भारतीय सेनेने त्यांच्या जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, जवान मंजूर अहमद हे 12 दिवसांच्या सुट्टीवर त्यांच्या घरी गेले होते. हल्ल्यावेळी ते निशस्त्र होते. बेग यांच्यामागे पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे.

बेग यांच्या हत्येनंतर हल्लेखोरांना शोधण्यासाठी अनंतनागमध्ये जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. याआधीदेखील काश्मीरमधील सोपोर येथील लाईट इन्फेंट्रीचे जवान मोहम्मद रफी यातू सुट्टीवर घरी आलेले असताना त्यांचीदेखील दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

श्रीनगर : शोपियाँमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाचं अपहरण आणि हत्या



गेल्या वर्षी ईदनिमित्त सुट्टीवर घरी आलेल्या जवान औरंगजेब याचीदेखील दहशतवाद्यांनी हत्या केली होती. जवान औरंगजेब यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा म्होरक्या शौकत अहमद दार याला गेल्या महिन्यात 18 मे रोजी जवानांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले.


नवी दिल्ली | शहीद औरंगजेब यांच्यासह 14 जणांचा शौर्य चक्राने गौरव