श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत एका बड्या अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानासह दोन जणांना ठार करण्यात आलं आहे. पण यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे.


दुजाना हा लष्कर-ए-तोयबाचा संपूर्ण काश्मीरसाठी म्होरक्या होता. अबू दुजानाच्या डोक्यावर 15 लाखांचं इनामही होतं. अबू दुजानीच्या खात्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षादलाना गोळीबार करावा लागत आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे.



दरम्यान, जम्मू-काश्मीमरमध्ये झालेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे अबू दुजानाचा हात होता. त्यामुळे लष्करासाठी ही कारवाई मोठं यश मानलं जातंय.लष्कराच्या कारवाईत आतापर्यंत एकूण 112 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

लष्कराच्या या कारवाईत अबू दुजानीसह इतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर आजून एका दहशतवाद्याचा शोध सुरु आहे. या दहशतवाद्याला शोधून काढण्यासाठी काकपुरा गावातील हाकरीपुर परिसराला लष्कराने ताब्यात घेतलं आहे.